लंडन ः कोरोना महामारीविरोधात लढा सुरू असताना ब्रिटेनमध्ये नव्या स्ट्रेनच्या फैलावामुळे समस्या आणखी वाढली आहे. नव्या स्ट्रेनच्या तपासणीसाठी आता ब्रिटेनमध्ये घराघरात टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे.
लॉकडाउनदरम्यान दक्षिण अफ्रिकेहून आलेल्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी फिरत्या वाहनांद्वारे रुग्णांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. एका दिवसात नव्या स्ट्रेनचे १०५ रुग्ण आढळल्यानं लॉकडाउनसह विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे.
पाकिस्तानमध्ये लसीकरण सुरू
कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी सऊदी अरब देशाने वीस देशातील नागरिकांच्या प्रवेशाला प्रतिबंध केला आहे. या नियमातून सऊदी अरबमधील डॉक्टर आणि राजकीय व्यक्तींना सूट दिली आहे. प्रतिबंध केलेल्या देशामध्ये भारताचाही समावेश आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सर्वात प्रथम तेथील पन्नास वर्षांवरील डॉक्टरांना लस दिली जात आहे. पाकिस्ताननं चीनकडून कोरोनाची लस घेतली आहे.
माडर्ना लसीला सिंगापूरकडून मंजुरी
माडर्ना लसीला मंजुरी देणारा सिंगापूर हा आशियामधील पहिला देश आहे. या लशीची पहिली खेप मार्चमध्ये दाखल होणार आहे. यापूर्वी सिंगापूरमध्ये फायझरचे लसीकरण करण्यात येत होते. सर्वच वयाच्या व्यक्तींना ऑस्ट्रेलियात फायझरची लस देण्यास मंजुरी दिलेली आहे. रशियामध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू असतानाही रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. गेल्या २४ तासात रशियामध्ये १६ हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेकडून वुहानमध्ये पाहणी
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, कोरोना विषाणूची उत्पत्ती झालेल्या चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेची जागतिक आरोग्य संघटनेच्या एक पथकानं बुधवारी पाहणी केली. प्रयोगशाळेतील कर्मचार्यांसोबत काही मुद्द्यांवर पथकाला चर्चा करायची आहे, असं पथकातील एका वैज्ञानिकानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे पथक तेथे पोहोचल्यानंतर प्रयोगशाळेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात होते. मुख्य म्हणजे पथकातील एकाही सदस्यानं पीपीई किट परिधान केले नव्हते.