नाशिक – कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर थंडीच्या वाढत्या लाटेत कोरोनाचीही दुसरी लाट येवू शकते, असा अंदाज तज्ञ व आरोग्य विषयक संस्थाकडून वर्तवले जात आहेत. परंतु नाशिक जिल्ह्यातील शासन-प्रशासन त्यासाठी सतर्क असून नागरीकांनीही त्यासाठी सतर्कता बाळगायची असून ही दिवाळी कोरोनामुक्त राहण्यासाठी ती फटाकेमुक्त राहून साजरी करावी असे आवाहन आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कोरोना विषयक आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगर पालिका आयुक्त कैलास जाधव,शहर पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रेखा रावखंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. अतुल वडगांवकर आदि उपस्थित होते.
ऑक्सिजनवर केवळ 450 पेशंट
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरतो आहे. 11 हजार च्या आसपास असलेली रुग्णसंख्या आज तीन हजारावर आली आहे. ऑक्सिजनवर केवळ 450 पेशंट सद्यस्थितीत आहेत. मध्यंतरी ऑक्सिजन ची कमतरता असली तरी आज आपल्याला दिवसाला 10 मे. टन इतक्या ऑक्सिजनची गरज आहे, परंतु आपल्याकडे दररोज 50 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध आहे, म्हणजेच लागणाऱ्या ऑक्सिजनच्या पाचपट ऑक्सिजनची क्षमता आज आपली आहे. व्हेंटीलेटर्सवर केवळ 50 पेशंट उपचार घेत असून ते आज आपण 250 व्हेंटीलेटर्सची क्षमता ठेवू आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात लाट आली, तरी आहे त्या क्षमतेसह जास्तीच्या क्षमतेने आपण सज्ज राण्याच्या सूचना सर्व संबंधीत यंत्रणांना देण्यात आल्या आहेत, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
मृत्यूदर केवळ 1.65 टक्के
पूर्वी दैनंदिन मृत्यूचे सरासरी प्रमाण 15 ते 20 त्या दरम्यान होते ते आज 2 ते 6 च्या दरम्यान आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर हा 2.63 टक्के इतका आहे त्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी म्हणजे 1.65 टक्के इतका आहे. राज्यात मृत्यू होणाऱ्या जिल्ह्यांच्या क्रमवारीत नाशिक जिल्हा ३० व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांपेक्षा जास्त असून त्यातही आपण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुढे आहोत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा डबलिंग रेट १४६ दिवसांचा आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनासह कोरोनाच्या या लढ्यात सर्वच यंत्रणा अत्यंत सतर्कतेने काम करत आहेत, याचा अंदाज आपल्याला या सर्व आकडेवारीतून येतो, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
कोमार्बिड रूग्णांवर उपचार
माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही ही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात राबवलेल्या मोहिमेला जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी मोठे यश मिळाले असून या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ६२ लाख लोकांची तपासणी करण्यात आली त्यात सुमारे पाच हजार कोरोना संसर्गित रूग्ण शोधण्यात आपण यशस्वी झालो आहोत. या मोहिमेची सर्वात महत्वाची फलनिष्पत्ती म्हणजे जिल्ह्यातील जवळ जवळ २ लाख ५० हजार कोमार्बिड रूग्ण आपण शोधू शकलो आहोत. या कोमार्बिड रूग्णांवर कोरोना संपल्यानंतर उपचाराचे धोरण निश्चित करून त्यांच्यावर उपचार करून कोरोना नसलेल्या रूग्णांचाही मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्री. श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.
मास्क हीच लस
सद्यस्थितीमध्ये कोरोना चा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे मास्क हेच सर्वात प्रभावी अस्त्र असल्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर वचक राहील अशी कारवाई पोलिस व मनपा यांनी करण्यावर भर देण्यात यावा असेही त्यांनी सांगितले. आपल्या कारवाईतून बेफिकीरीने वागणाऱ्यांचे जबाबदारीने वागण्यासाठी मनपरिवर्तन होईल, अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.
फटाके फोडू नका
सार्वजनिक ठिकाणी फटाके न फोडण्याचा व त्याचे प्रदूषण होणार नाही याबाबत जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाचे काटेकोर पालन नागरीकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. फटाक्यांच्या प्रदुषणामुळे फुफ्फुसांवर विपरित परिणाम होवून त्यामुळे कोरोना रूग्ण व सर्वसामान्य नागरीक यांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो, त्यामुळे सर्वांनी कोरोनामुक्त राहण्यासाठी फटाकेमुक्त व प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी व सर्वांना ही दिवाळी आरोग्यदायी व समृद्धीची जावो यासाठी शुभेच्छा दिल्या.