नाशिक – नाशिक जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेवून कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच लॉकडाउन टाळण्यासाठी जनतेने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आज संयुक्त आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोविड आढावा बैठकीत केले आहे.
याबैठकीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी सुरज मांढरे महापालिका आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड , पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शर्मिष्टा वालावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेवून मार्गदर्शन करतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, गतवर्षी सुरू झालेल्या कोरोना काळात सर्वच यंत्रणांनी केलेले काम हे कौतुकास्पद आहे. मध्यल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला होता. परंतू सद्यपरिस्थितीत पुन्हा कोरोना रुग्णांची वाढती संख्या काळजी करण्यासारखी आहे. यापरिस्थितीवर मात करण्यासाठी आणि लॉकडाउन टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी कोरोनाबाबतनियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी विलगीकरणाचे नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पोलीस व मनपा पथकामार्फत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पोलिस यंत्रणा व महानगरपालिका यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.
कोरोनाचा विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनाने सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे यांच्या मदतीने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या धोक्याबाबत जनजागृती करावी. या विषाणूपासून स्वत: सोबत इतरांचे रक्षण करण्यासाठी नियमांचे पालन करून नागरिकांनी महत्वाची भूमिका पार पाडावी, असे देखील पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करतांना कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, जिल्ह्यात वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येते 15 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. या कालावधीत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कृषीमंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत दहापट अधिक तपासणीचे प्रमाण वाढविण्यासाठी नियोजन करण्यात यावे, गृहविलगीकरणाचे प्रमाण कमी करून बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात यावे, तसेच हॉटस्पॉट ठरत असलेल्या भागात प्रतिबंधित क्षेत्र निर्माण करून तेथे कोरोनाचे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी असे विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी सांगितले. तसेच लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी खाजगी रुग्णालयांची मदत घेण्याकरिता जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांचा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनास सादर करावा असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.










