मिझोरम – देशातील काही राज्यात कोरोना संक्रमण कमी असल्याने संबंधित राज्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर मिझोरममध्ये देखील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्यातील दोन खासगी शाळांमधील १५ विद्यार्थ्यांसह आणखी ५८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर तात्काळ शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी राज्यात संक्रमित झालेल्यांची संख्या २४४७ पर्यंत पोहोचली आहे. याबाबत मिझोरमच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
आयजोल जिल्ह्यात सर्वाधिक ४४ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय नाहतियाल आणि कोलासिब येथे प्रत्येकी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे सरछिप, खावजोल येथे प्रत्येकी दोन रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले आहे. सध्या मिझोरममध्ये २४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात २१९८ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच राज्यात कोरोना विषाणूमुळे अद्याप कुणाचाही मृत्यू झालेला नाही अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर कोरोना संसर्गात वाढ झाल्यामुळे मिझोरम सरकारने सोमवारपासून दहावी व बारावीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १६ ऑक्टोबर रोजी या शाळा उघडण्यात आल्या होत्या.