नवी दिल्ली ः केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनारुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने महामारीच्या दुसर्या लाटेचे संकेत मिळाले होते. परंतु पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरातसह काही राज्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने दुसर्या लाटेची पुष्टी मिळाली आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक संसर्ग करणारी आहे. दुसरी लाट अधिक घातक नाही हीच समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल.
सहा महिन्यांनंतर एका दिवसात जवळपास ८२ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. चार महिन्यांनंतर ४६९ लोकांचा मृत्यू झालेला आहे. नमुन्यांची तपासणी करण्याच्या तुलनेत प्रतिदिन मृतांची संख्या पहिल्यापेक्षा कमीच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सुधारित आकडेवारीवरून २४ तासात देशात ८१,४६६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन ऑक्टोबरपासून ८१,४८४ नवे रुग्ण आढळले होते. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत १८ अधिक रुग्णांची भर पडली आहे. यादरम्यान ४६९ लोकांचा मृत्यू झालेला आहे. ५०,३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या वर्षी ६ डिसेंबरला ४८२ लोकांचा मृत्यू झाला होता.
आतापर्यंतचा एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १.२३ कोटींहून अधिक झाला आहे. त्यातील १.१५ कोटी लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. तर १,६३,३९६ लोकांचा जीव गेलेला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यात आजपासून मिनी लॉकडाऊन सुरू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
…तर लॉकाडाउन लावावेच लागेल
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्यावाढीचा वेग असाच राहिला तर परिस्थिती नियंत्रणात आणणे कठिण जाईल. त्यानंतर लॉकडाउन हाच अंतिम उपाय असेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी (२ एप्रिल) मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. पूर्ण लॉकाडाउन लावण्यावर त्यांनी भाष्य न करता सध्याच्या परिस्थितीची आकडेवारी मांडून जाणीव करून दिली. अनेकांचा लॉकडाउनला विरोध आहे, पण राज्यातील आरोग्ययंत्रणेवरील भार पाहता लॉकडाउन लावण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या एक-दोन दिवसात प्रतिबंधात्मक नियमावली जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.