सिंगापूर – कोरोना विषाणूद्वारे होणारा संसर्ग कमी करण्यासाठी वैज्ञानिकांना मोठे यश मिळाले आहे. सिंगापूरमधील संशोधकांनी श्वासोच्छ्वासाची अनोखी चाचणी विकसित केली आहे. त्याद्वारे अवघ्या एका मिनिटात संक्रमण झाले असल्याची माहिती मिळणार आहे. यासाठी खास मशीन लर्निंगचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जगभरात निरनिराळ्या लसीवर काम सुरु आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयूएस) येथील संशोधक यावर काम करत असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यात नमुने गोळा करण्यासाठी डिस्पोजेबल माऊथपीसमध्ये जोरात थुकावे लागते. याद्वारे संबंधित व्यक्तीच्या श्वासातील अस्थिर सेंद्रीय संयुगे (व्हीओसी) शोधण्यास मदत मिळते व मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या एका मिनिटात संसर्ग झाल्याचे समजते.
तोंडातून हवा बाहेर आल्यानंतर एका स्पेक्ट्रोमीटरमध्ये गोळा केले जाते. त्यात कोरोना विषाणूचे घटक आहेत की नाही हे शोधण्यासाठी मशीन लर्निंगद्वारे त्याचे विश्लेषण केले जाते. खास गोष्ट म्हणजे संबंधित मशीन निष्कर्ष काढण्यासाठी एका मिनिटापेक्षा कमी वेळ घेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. नवीन तंत्रज्ञान एन.यू.एस. च्या स्टार्टअप ब्रेथॉनिकने विकसित केले आहे, जे संक्रमण शोधण्यासाठी वेगवान आणि सोयीस्कर असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.