नवी दिल्ली – भारतात कोरोनावरील लस वर्षाअखेरीस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसे सूतोवाच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. देशातील कोरोनाची एक लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. तर इतर दोन लसींची प्रगतीही समाधानकारक असून त्या चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
लस विकसित करणाऱ्या संस्थांकडून आम्ही सतत आढावा घेत आहोत. या सर्वांची प्रगती समाधानकारक आहे. लसीकरण विषयक बाबी आणि पुरवठा साखळीची संपूर्ण तयारी झाली आहे. जेंव्हा केंव्हा गरज लागेल तेंव्हा वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आधारावर लसीकरण विषयक तयारीचे सूक्ष्मपातळीवरील नियोजन लगेच अमलात आणले जाईल असेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले.