नाशिक – लसीकरणासाठी जिल्ह्यात ६५० लसीकरणाचे बुथ निर्माण करण्यात येणार असून एका बुथवर किमान १०० नागरिकांना एका दिवसात लसीकरण केले जाईल, या दृष्टिने प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे. तसेच एक लस ही काही दिवसांच्या अंतराने दोन वेळा देण्यात येणार असल्याने त्याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणाकडून तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या लसीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तयारीचे सादरीकरण केले. येत्या काही महिन्यात उपलब्ध होणाऱ्या कोविड लसीबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या लसींची निर्मीती करण्यात येत असून या लसी देण्याचे प्रमाण व पद्धती देखील भिन्न आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एकाच प्रकारची लस उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न व्हावेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी बैठकीत केले.