औरंगाबाद – राज्यातील कोरोनारुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्यानं वाढ होत असल्यानं स्थानिक प्रशासन कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत आहे. रुग्ण वाढल्यानं औरंगाबादमधील गर्दीच्या भागांमध्ये लॉकडाउन करण्यात येणार आहे. पैठण गेट, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, जाधवमंडी हे औरंगाबादमधील सर्वाधिक गर्दी होणारे परिसर म्हणून ओळखले जातात. या गर्दीमुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनानं या भागात लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. इतर ठिकाणीही कडक निर्बंध लागू असतील, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
औरंगाबादेत ३७१ नवे रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी (३ फेब्रुवारी) दिवसभरात ३७१ नव्या कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बाधितांचा आकडा ५१,२८७ वर पोहोचला आहे. यापैकी ४७,५६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १२७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या २४४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अमरावतीत शासकीय कार्यालयांमधील ८० कर्मचारी बाधित
अमरावतीमधल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह महापालिकेतल्या ८० कर्मचारी अधिकार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ५ कर्मचार्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे. कर्मचार्यांमध्ये झोन क्रमांक १,२,३ चे सहाय्यक आयुक्त, शहर अभियंता, सिस्टिम मॅनेजर, विधी अधिकारी, उपअभियंता, डॉक्टर, लिपिक यांचा समावेश आहे.
पुण्यात ४२ प्रतिबंधित क्षेत्रे
काही दिवसांपासून पुण्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढल्यामुळे महापालिकेनं कठोर पावले उचलली आहेत. पुण्यातल्या १० क्षेत्रीय कार्यालयांच्या विभागात ४२ प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये हडपसर परिसरात सर्वाधिक पाच क्षेत्रे आहेत. पुणे महापालिकेकडून अधिकार्यांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोठ्या इमारतींमध्ये रुग्ण सापडल्यास ती इमारत सील करण्याचे आदेश दिले आहेत.