नाशिक – अवघ्या दहा मिनिटात कोरोनाचे निदान करणारी अँटीजेन चाचणी करण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच गेल्या २४ दिवसात तब्बल ३३ हजार ७१० जणांनी अँटिजेन चाचणी केल्याचे दिसून येत आहे. या चाचणीत तब्बल ८८ टक्के जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांचे पुढाकाराने “मिशन झिरो नाशिक” हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत लक्षणे असलेल्या तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेणे त्यांच्यावर औषधे व उपचार करणे, आयुर्वेदिक काढा देणे, समुपदेशन करणे, रुग्णांचा पाठपुरावा करणे व कुटुंबातील व संपर्कातील इतर सदस्यांचीही तपासणी करण्याचे काम केले जात आहे. यामुळे रुग्ण लवकर बरे होऊन त्यांना शारिरीक व मानसिक बळ मिळत आहे. त्याचप्रमाणे पुढील होणारे संक्रमणही थांबविण्यात मिशन झिरो अभियानाला यश आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असले तरी या मिशनमुळे कोरोनाला अटकाव केला जात आहे.
या अभियानात सोमवारी (१७ ऑगस्ट) १ हजार २३९ नागरिकांनी अँटीजेन चाचणी केली. त्यातील २२१ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. याची टक्केवारी १७.८३ एवढी आहे. तर एकूण २४ दिवसात कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण केवळ १२.३० टक्के एवढे आहे. या अभियानात २१ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन आणि २२५ हून अधिक कर्मचारी व कार्यकर्ते सध्या कार्यरत आहेत. या मोफत चाचणी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा यांनी केले आहे.