मुंबई – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)चे महासंचालक (डीजी) शेखर मांडे यांनी कोरोनाचे संकट अद्याप देशातून गेलेले नाही, असा इशारा दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट कधिही येऊ शकते, अशी भिती व्यक्त करताना नागरिकांनी बेजबाबदार वर्तन थांबवले नाही तर ही लाट सर्वाधिक धोकादायक ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
सध्याच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्थांमध्ये सातत्याने सहकार्य आणि समन्वय आवश्यक आहे. तसेच जलवायू परिवर्तन आणि पारंपरिक इंधनावर अतिनिर्भर राहिल्याने निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करण्याची क्षमताही आवश्यक आहे. अश्या संकटाच्या स्थितीत संपूर्ण मानवजातीसाठी धोका निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (आरजीसीबी)च्या वतीने आयोजित एका डिजीटल सेमिनारमध्ये ते बोलत होते. त्यांनी निष्काळजीपणावरून जनतेला आणि वैज्ञानिक संस्थांना इशारा देताना सांगितले की महामारीची तिसरी लाट आली तर त्याचा सामना करणे हे पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. तरीही विषाणूच्या विविध रुपांवर कोरोनाची लस अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत दिल्लीत 6 लाख 39 हजार 289 लोकांना कोरोना झाला आहे. यातील 6 लाख 27 हजार 44 रुग्ण बरे झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के आहे. तर आतापर्यंत दिल्लीत 10 हजार 910 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत 1 हजार 335 रुग्ण आहेत. यातील 446 रुग्णालयात भरती आहेत.
मास्क अत्यावश्यक
भारत सध्या सामुदायिक प्रतिरोधक क्षमता अर्थात हर्ड इम्युनिटी प्राप्त करण्यापासून बराच लांब आहे. अश्यात लोकांनी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. तसेच फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम, नियमीत हात स्वस्छ धुणे आदी गोष्टी देखील पाळाव्या लागतील, अश्या सूचना त्यांनी केल्या.