नाशिक – कोरोना संकट व लाॅकडाऊनमुळे गेल्या सहा महिने कामबंदमुळे सर्व सामांन्याप्रमाणे वारकरी, कलावंत यांची आर्थिक परीस्थिती खालावली आहे. त्यातच सर्वच धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. अशा काळात मृदुंगवादक, पेटीवादक, गायक,भालदार, चोपदार,विणेकरी, काही किर्तन प्रवचनकार,व्यासपीठचालकही मोठ्या आर्थिक बिकट परीस्थितीचा सामना करत आहेत.
सध्या गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाचे संकट असल्यामुळे नाशिक शहरासह जिल्हयातील सर्व मंदिरे , मठ आणि धार्मिक संस्था बंद आहेत. त्यामुळे भजन, किर्तन, प्रवचन आदि सह हरिनाम सप्ताह देखील बंद आहे. त्यामुळे वारकरी आणि तबला, पेटी वादक , भजन गायक आदी कलावंताची उपासमार होत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावी, असे आवाहन अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले डिकसळ व जिल्हाध्यक्ष हभप आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांच्या वतीने सर्व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.शासन नक्कीच या मागणीचा विचार करुन कलावंताना जिवनावश्यक किटचे लवकरच वाटप करील अशी अपेक्षा हभप बापु महाराज पवार व मालेगांव तालुका वारकरी मंडळ यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकरी व कलावंताना सर्व तालुक्यातून तहसिलदार स्तरावर मदत मिळावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर, मालेगांव तालुकाध्यक्ष हभप बापू महाराज पवार (पिंपळगांव दा.) यांनी केली आहे.