नवी दिल्ली – देशात वाढत्या कोरोनारुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत थोड्याच वेळात बैठक घेणार आहेत. कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लसीकरण अभियानाबाबत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील.
वेळोवेळी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान वेळोवेळी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आले आहेत. पंतप्रधानांनी जानेवारीत लसीकरण अभियानाला सुरुवात होण्यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. तेव्हा तीन कोटी आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचार्यांना लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होते. सद्यपरिस्थितीत साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.
लसीकरण अभियानावर भर
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण अभियान वेगान व्हावं, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. त्यासंदर्भातच पंतप्रधान बुधवारी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. कोरोना लसीकरणात आतापर्यंत तीन कोटींहून अधिक नागरिकांना डोस देण्यात आला आहे. परंतु संसर्ग वाढल्याने लसीकरण अभियानाला वेग येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटकमुळे चिंता वाढली
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये वाढत्या संसर्गामुळे चिंता वाढली आहे. देशातील ७८ टक्क्यांहून अधिक नवीन रुग्ण याच पाच राज्यात आढळले आहेत. ८५ दिवसांनंतर देशात २६,२९१ नवीन रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात ११८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी २० डिसेंबरला २६,६२४ रुग्ण आढळले होते. त्यामध्ये महाराष्ट्रात १६,६२०, केरळमध्ये १७९२ आणि पंजाबमध्ये १,४९२ रुग्णांचा समावेश आहे. देशात सध्या संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्या वाढून एक कोटी १३ लाख, ८५ हजार झाली आहे.