बंगळुरू – देशभरात कोरोना विषाणूची प्रकरणे निरंतर वाढत आहेत, परंतु यादरम्यान काही भयानक आकडेवारी समोर आली आहे. या महिन्यात १ ते २६ मार्च दरम्यान कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये १० वर्षांखालील ४७० पेक्षा जास्त मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शहरात संसर्ग होण्याच्या अशा घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार १ ते २६ मार्च दरम्यान एकूण २४४ मुले आणि २२८ मुलींना संसर्ग झाला. या महिन्याच्या सुरुवातीस, दररोज आठ ते नऊ मुलांना संसर्ग होत होता, परंतु त्यांची संख्या हळूहळू वाढत गेली आणि २६ मार्च रोजी ती ४६ वर पोचली. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आता मुलांच्या संसर्गाचा धोका पूर्वीपेक्षा जास्त झाला आहे. कारण काही मुले शाळा उघडल्यानंतर बहुतेक वेळा घराबाहेर पडत आहेत.
भारतीय सार्वजनिक आरोग्य फाउंडेशनचे प्रो. गिरीधर बाबू म्हणाले की, शाळा सुरू झाल्यामुळे, तसेच कार्यक्रमांत व मेळाव्यात भाग घेतल्यामुळे मुलांना अधिक धोका पत्करावा लागला आहे. पूर्वी ते सुरक्षित होते परंतु आता धोका वाढला आहे.
काही ठिकाणी हे संक्रमण मुलांपासून कुटुंबातील सदस्यांपर्यंतही पसरत आहे. मुलांना दीर्घ काळासाठी सामाजिक अंतर पाळणे आणि मास्क घालणे कठीण आहे. तसेच १० वर्षांखालील मुले शाळेत जात नसली तरी मैदानामध्ये आणि इतर मुलांसमवेत पार्कमध्ये खेळतात.