नवी दिल्ली – युरोपातील काही देशामध्ये कोरोनाचा कहर कमी होत असतानाच जर्मनीमध्ये कोरोना संसर्ग होण्याच्या नवीन घटनांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे पुन्हा एकदा देशव्यापी कर्फ्यू जाहीर केला जाऊ शकतो.
जगात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ९ कोटी ६७ लाखांपेक्षा जास्त आहे, तर मृतांची संख्या २० लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच या साथीच्या आजारामुळे सुमारे ७ कोटी रुग्ण आता पर्यंत बरे झाले आहेत.
जगात २० लक्ष रुग्ण सक्रिय आहेत, त्यापैकी १ लाख संक्रमित रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत आहेत. दरम्यान, जर्मनीमध्ये संसर्ग होण्याच्या नवीन घटनांमध्ये पुन्हा वाढ दिसून येत आहे. त्यामुळे जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत पुन्हा एकदा देशव्यापी कर्फ्यू जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशात एका दिवसात १२ हजार १५९ रुग्ण आढळले, तर ११३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगातील कोरोनाचा जास्त कहर असलेल्या देशात अमेरिका, ब्राझील, रशिया, यूके , फ्रान्स, इटली आदी देशांचा समावेश आहे. तसेच भारतात अधिक संसर्ग असलेल्या राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, दिल्ली आदींचा समावेश आहे.