नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू समोर आल्याने संपूर्ण जगभरातच चिंतेचे वातावरण आहे. त्यातच भारताने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आगामी प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित केले आहे. कोरोनाचा नवा घातक विषाणू लक्षात घेता भारत सरकारने जॉन्सन यांचे निमंत्रण रद्द करावे, अशी आग्रही मागणी विविध स्तरातून केली जात आहे. ब्रिटनहून भारतात येणारी सर्व विमाने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून जॉन्सन यांचे निमंत्रणही रद्द करावे, असे मत माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. तसेच, गेल्या काही दिवसात ज्या व्यक्ती ब्रिटनहून आल्या आहेत. त्यांना विलगीकरणात ठेवावे तसेच, त्यांना देखरेखीखाली ठेवणे आवश्यक असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.