वॉशिंग्टन – अमेरिकेत लसीकरण सुरू झाले असले तरी कोरोनाचा कहर सुरूच आहे. बाधितांची संख्या दोन कोटींपुढे गेली असून मृतांची संख्याही साडे तीन लाखांच्या पुढे गेली आहे. त्यातच गेल्या १९ दिवसात तर तब्बल ५० हजार जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेत विशेष चिंता व्यक्त होत आहे.
अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या गेल्या १४ डिसेंबर रोजी तीन लाख होती. न्यूयॉर्क प्रांतात सर्वाधिक म्हणजे ३८ हजार २७३, टेक्सासमध्ये २८ हजार ३३८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण अमेरिकेत जणू भयाचे वातावरण तयार झाले आहे.
कॅलिफोर्नियात दफनभूमीची कमरतता
कॅलिफोर्नियामध्ये २६ हजार ५४२ आणि फ्लोरिडामध्ये २१ हजार ८९० कोरोना मृत्यू झाले आहेत. न्यूयॉर्क, इलिनॉय, पेनसिल्व्हेनिया, मिशिगन, मॅसेच्युसेट्स आणि जॉर्जिया येथेही फैलाव वाढतच आहे. कॅलिफोर्नियात तर स्मशानभूमीच दफनविधीसाठी अपुरी पडत आहे. कॉन्टिनेंटल फ्युनरल होमचे मालक मॅग्दा मालडोनाडो म्हणाले की, “मी गेल्या चाळीस वर्षांपासून या उद्योगात आहे आणि माझ्या आयुष्यात अशी परिस्थिती मी कधीही पाहिली नाही.”
खूपच वाईट परिस्थिती
मृतदेहांची वाढती संख्या पाहता मॅग्डा यांनी ५० फूट रेफ्रिजरेटर भाड्याने घेतलेले आहेत. तसेच, रुग्णालयातून मृतदेह आणण्यासाठी एक ते दोन दिवसांचा उशीरही जाणून बुजून केला जात आहे. अंतिम संस्कारांची प्रक्रिया अतिशय संथ झाल्याचे कॅलिफोर्निया फ्यूनरल डायरेक्टर्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक बॉब आर्चमन यांनी म्हटले आहे. स्मशानभूमीची संपूर्ण प्रक्रिया मंदावली आहे. जिथे दोन दिवसात अंत्यसंस्कार होत होते तिथे आता चक्क एक आठवडा लागत आहे. ही सारी परिस्थिती पाहून नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत.