कोयत्याचा धाक दाखवत तडीपाराने लुटले
नाशिक : कोयत्याचा धाक दाखवत एका तडीपारासह त्याच्या साथीदारास तरूणास लुटल्याची घटना गणेशवाडीत घडली. या घटनेत दुकलीने सतरा हजार ३०० रूपये बळजबरीने काढून घेतले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकी किशोर बजाज (रा.गणेशवाडी) व श्रीकांत उर्फ टकल्या मुकणे (रा.पंचवटी) अशी तरूणास लुटणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी दिनेश मिलींद सनान्से (२० रा.शेरेमळा,गणेशवाडी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. दिनेश सनान्से ३१ डिसेंबरच्या रात्री आपल्या घराबाहेर बसलेला असतांना ही घटना घडली. हातात कोयता घेवून आलेल्या संशयीतांनी परिसरात दहशत माजविली. त्यानंतर सनान्से यास गाठून संशयीतांनी हे कृत्य केले. तडीपार असलेल्या विक्की बजाज आणि टकल्या मुकणे या दोघांनी सनान्से यास गाठून दमदाटी करीत पोटाला धारदार कोयता लावून खिशातील १७ हजार ३०० रूपये बळजबरीने काढून घेतले. यावेळी संशयीतांशी झालेल्या झटापटीत सनान्से याच्या कपाळास कोयत्याची मुठ लागल्याने दुखापत झाली असून,अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.
……
पेठरोडला तडीपार जेरबंद
नाशिक : शहर आणि जिह्यातून हद्दपार केलेले असतांना शहरात वावरणा-या तडीपार गुंडास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत पेठरोडवरील आरटीओ कार्यालय परिसरात मिळून आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक किसन चोथे (३० रा.अश्वमेधनगर,पेठरोड) असे अटक केलल्या संशयीत तडीपार गुंडाचे नाव आहे. गुन्हेगारी कारवायांमुळे चोथे यास गेल्या वर्षी शहर पोलीसांनी हद्दपार केले आहे. दोन वर्षांसाठी शहर आणि जिह्यातून त्यास तडीपार केलेला असतांना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पंचवटी पोलीस त्याच्या मागावर असतांना शुक्रवारी (दि.१) आरटीओ कार्यालय परिसरात त्यास बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस कर्मचारी कल्पेश जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास नाईक डी.पी.बोंबले करीत आहेत.
……