मुंबई – सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निवृत्तीसाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक असल्यामुळे पुढील सरन्यायाधीश कोण होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारनेही यासंदर्भातील प्रक्रिया सुरू केलेली आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांना उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्याच्या बाबत केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी न्या. बोबडे यांना एक पत्र लिहिले आहे. न्या. बोबडे २३ एप्रिलला सेवानिवृत्त होणार असल्यामुळे त्यांनी नव्या सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस करावी, असे या पत्रात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत सरन्यायाधीशाची निवड ही ज्येष्ठतेच्या आधारावर व्हायला हवी, अशी न्यायपालिकेची प्रथा आहे.
विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी शिफारस केल्यानंतर कायदेमंत्री रविशंकर प्रसाद संबंधित शिफारस पंतप्रधानांपुढे ठेवतात. त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्यावर शिक्कामोर्तब होते. न्या. बोबडे यांच्यानंतर न्या. एन. व्ही. रमण हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. शिवाय त्यांचा न्यायाधीश म्हणून कार्यकाळही २६ आॅगस्ट २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. न्या. शरद बोबडे यांनी १८ नोव्हेंबर २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्षाचा कालावधी त्यांना मिळाला. न्या. रंजन गोगोई यांच्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला होता.