मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मनसुख हिरेन याची स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. त्यानंतर काहीच दिवसांत मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला होता. मुंबई एटीएसने मनसुख यांच्या मृत्यूचा छडा लावला आहे. या प्रकरणात एटीएसने दोन लोकांना अटकही केली आहे. यात एक निलंबित पोलीस कर्मचारी आहे तर दुसरा मोठा बुकी आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ३०मार्चपर्यंत एटीएसच्या कोठडीत सोपविले आहे. ज्या आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात हे प्रकरण उलगडले आहे, त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे प्रकरण सुटल्याची माहिती दिली आहे.
शिवदीप लांडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘हे प्रकरण माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अत्यंत आव्हानात्मक आणि महत्त्वाचे असे होते.’ दिवस–रात्र मेहनत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचेही त्यांनी फेसबुकवरून आभार मानले आहे. शिवदीप लांडे बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. बिहारमध्ये पोस्टींग असतानाही त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. शिवदीप लांडे यांचे महाराष्ट्रात शिवसेनेसोबत चांगले कनेक्शन असल्याचे बोलले जाते.
लांडे यांचे सेना कनेक्शन
महाराष्ट्राचे तेजतर्रार आणि दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. शिवदीप लांडे आणि डॉ. ममता शिवतारे पती–पत्नी आहेत. शिवदीप लांडे जेव्हा पाटणा येथून मुंबईत आले तेव्हा त्यांना मुंबईत अँटी नार्कोटिक्स विभागाची जबाबदारी देण्यात आली. सध्या ते महाराष्ट्रात दहशतवादविरोदी पथकात डीआयजी म्हणून कार्यरत आहेत.
मुलींना दिला मोबाईल नंबर
बिहारमध्ये शिवदीप लांडे यांच्या नावावर अनेक कारनामे आहेत. विशेषतः मुलींची छेडखानी करणाऱ्या रोड रोडमिओंना त्यांनी असा दणका दिला की हिरोसारखी त्यांची प्रतिमा झाली. कोणत्याही क्षणी मदत लागली तर हाक देण्यासाठी त्यांनी आपला मोबाईल नंबर मुलींना दिला होता. त्यानंतर ते स्वतःच रोमिओंना दणका देण्यासाठी स्पॉटवर पोहोचून जायचे.