नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. एस. बोबडे हे १४ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करीत असून आता त्यांच्या सेवानिवृत्तीला अवघे दोन महिने शिल्लक आहेत. परंतु आतापर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात आणण्याची शिफारस केलेली नाही. मात्र, त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अकील कुरेशी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती मिळविण्यासाठी धडपड करीत असून न्याय तथा विधी खात्यात त्यांचीच चर्चा होत आहे.
यापूर्वीही झाला वाद
असाच वाद यापूर्वी मुख्य न्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या कार्यकाळात २०१५ मध्ये झाला होता. त्यावेळी न्यायव्यवस्था आणि सरकार यांच्यात राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगावरून वाद झाला. तथापि, या वेळी हा न्यायालयांचा अंतर्गत वाद आहे.
आता सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अकिल कुरेशी यांची नियुक्ती करण्याबाबत एकमत झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तथापि, कुरेशी यांचे नाव घेताना अडचणी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून तसेच त्रिपुराचे मुख्य न्यायाधीश म्हणून कुरेशी यांच्या नियुक्तीच्या वेळीही सुप्रीम कोर्टातील नियुक्तीसाठी वाद झाला होता.
त्याआधी त्यांना मध्य प्रदेश हायकोर्टासाठी मुख्य न्यायाधीश करण्यात आले होते, पण काही आक्षेपानंतर त्यांना त्रिपुरा येथे पाठविण्यात आले होते. त्यावेळी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई होते. तर सध्याच्या समितीमध्ये न्या. सी.आय. अरविंद, न्या. शरद बोबडे, न्या.एन.व्ही. रमन्ना, न्या.रोहिंटन नरिमन, न्या.वायू ललित, न्या. ए.एम. खानविलकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात चार न्यायाधीशांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांवर कुणाची नियुक्ती होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.