मुंबई – कोट्यवधींचे फ्लॅट स्वस्तात विक्री करून फसविणाऱ्या टोळीचा मुंबई क्राइम ब्रँचनेने पर्दाफाश केला असून या प्रकरणात नाशिकच्या एका व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे.
मुंबई क्राइम ब्रँच युनिटच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने जप्त केलेले फ्लॅट कमी दरात विकण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी सचिन बोर्डे या संशयित आरोपीला नाशिक येथून अटक करण्यात आली होती. तसेच इतर काही संशयित अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या आरोपीविरूद्ध गेल्या वर्षी एमएचबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्याने बोरिवली भागात फ्लॅट उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने तक्रारदाराची १५ लाखांची फसवणूक केली होती. मुंबई आणि अन्य भागात ही गुन्हेगारी टोळी कारवाया करीत होती. सदर आरोपी विविध सबब सांगून पोलिसांची दिशाभूल करीत होता. आणि शेवटी त्याने फोन कॉल घेणे बंद केले आणि तो आपल्या कुटूंबासह मुंबईतून पळून गेला. मात्र अखेर पोलीसांनी त्याला शिताफीने अटक केली.