नवी दिल्ली – कोरोना संसर्गाचे प्रमाण घटत असून त्याचा कमी होणारा प्रभाव लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आवश्यक सुरक्षा व्यवस्था करीत देशभरातील बंद विद्यापीठे आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत.
कॉलेज, विद्यापीठ सुरू करण्याबाबत राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या संमतीच्या आधारे निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच यूजीसीने सध्या यासंदर्भात विद्यापीठे व महाविद्यालयांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्याचप्रमाणे खासगी शैक्षणिक संस्थांना यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.
बंद असलेली विद्यापीठे, कॉलेज आणि इतर उच्च शैक्षणिक संस्था उघडण्याची यापुर्वी विद्यार्थ्यांनी वारंवार केलेली मागणी लक्षात घेता यूजीसीने हे निर्णायक पाऊल उचलले असले तरी यूजीसी देखील याबद्दल पूर्णपणे सावध आहे, कारण महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यात अजूनही कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर आहे. तेथे दररोज कोरोनाची नवीन हजारो प्रकरणे नोंदवली जात आहेत. अशा परिस्थितीत युजीसीला या ठिकाणी घाई करायची नाही किंवा शैक्षणिक संस्थांवर कॉलेज उघडण्यासाठी दबाव आणायचा नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी आणि नियमांच्या आधारावर उपस्थित राहण्याच्या संबंधित निर्णय घेण्याचे संबंधित अधिकार संस्थांना देण्यात आले आहेत.
यूजीसीने संस्था उघडण्याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीवरही जोर दिला. जेव्हा ऑफलाइन वर्ग सुरू होतील तेव्हा विद्यार्थी एका जागेवरच बसतील जाईल. तसेच, मास्क घालणे आणि वारंवार हात साफ करणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान, बहुतेक राज्यात शाळा सुरू झाल्या असून केवळ नववी ते बारावीपर्यंतच्या मुलांना बोलावले जाते. सर्व विद्यार्थी अद्याप शाळेत येत नाहीत, तसेच, पालकांची परवानगी देखील आवश्यक आहे. कारण शाळा तसेच देशातील उच्च शैक्षणिक संस्था गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना सुरू झाल्यानंतर अजूनही बंद आहेत.