हैदराबाद – आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून सुमारे ९ कॉर्पोरेट कंपन्यांकडून ४० लाख रुपये हडप केल्याप्रकरणी हैदराबादमध्ये माजी रणजी क्रिकेटपटूला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १० लाख रुपये जप्त केले आहेत.
श्रीकाकुलम जिल्ह्यातील बुद्धुमुरु नागराजू हा २५ वर्षीय एमबीए झालेला युवक २०१४ मध्ये आंध्रप्रदेश संघाकडून रणजी करंडक सामन्यात क्रिकेट खेळला आहे. मात्र त्याला आता २०१८ ते २०२० दरम्यानच्या काळात ९ बड्या कंपन्यांची फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे, त्याने सरकारी व खासगी रुग्णालये, राज्य सरकारी संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्याकडून पैसे घेऊन ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
हैदराबादचे पोलिस आयुक्त अंजनी कुमार यांनी सांगितले की, सदर आरोपी कॉर्पोरेट कंपन्या आणि संस्थांना फोन नंबरवर कॉल करून ते मंत्री के. टी. रामाराव यांचे खाजगी सचिव भंडारी तिरुपती बोलत असल्याचे वर्णन करायचे. तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी मंत्री शपथ घेणार आहेत. तसेच एलबी स्टेडियममध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी तो कंपन्यांकडे पैशाची मागणी करत असे.
या पैशांतून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात जाहिरात केली जाईल आणि होर्डिंग्ज बसविली जातील, असेही सांगत असे. या ९ कॉर्पोरेट कंपन्यांकडून त्याने ३९,२२,४०० रुपये उकळले, मात्र पोलिसांनी त्याला अटक करून मोबाईल फोनसह १० लाख रुपये जप्त केले आहेत. आंध्र प्रदेशच्या वतीने क्रिकेट खेळताना त्याला चैनीचे आयुष्य जगण्याची सवय झाली होती. परंतु संघातून बाहेर पडल्यानंतर त्याने पैसे कमवण्यासाठी फसवणूकीचा हा मार्ग निवडला होता.