नाशिक – गेली पाच दशके कामगार चळवळीत योगदान देणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. श्रीधर देशपांडे यांचे शनिवारी ( ३ एप्रिल) रोजी सकाळी सात वाजता कोविड संसर्गामुळे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. आठवडाभरापासून ते आजारी होते. सुरुवातीला किर्लोस्कर हॉस्पिटल व नंतर डॉक्टर कराड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती सुधारत असतानाच काल सायंकाळी त्यांची प्रकृती गंभीर होत गेली व आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
श्रीधर देशपांडे यांनी विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून भरीव काम केले. माकपचे शहर सचिव म्हणून त्यांनी काम केले. आता सीटूचे अध्यक्ष आणि पक्षाच्या शहर सचिव मंडळात ते सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी मनीषा, मुलगा हेमंत आणि सून अश्विनी आणि दोन नातवंडे असे कुटुंब आहे. कॉ. देशपांडे यांचा डाव्या पुरोगामी संघटना यांच्याबरोबर त्यांचा घनिष्ठ संबंध होता.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व सिटू संघटनेमध्ये त्यांनी नेतृत्व दायी भूमिका बजावली. जिल्ह्यातील बंद पडलेल्या बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या धड्याचे त्यांनी नेतृत्व केले व न्याय मिळवून दिला. नाशिक शहरातील व जिल्ह्यातील विविध पक्ष व संघटनेतील नेत्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते.
शेतकरी कामगार यांच्या चळवळी बरोबरच वर्तमानपत्रांमधून ते सातत्याने लिखाण करत असत. देशपांडे यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया डाव्या संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
—