नवी दिल्ली – राजधानीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी आणि सध्या चर्चेत आहेत ते शेतकरी नेते राकेश टिकेत (चौधरी). त्यांनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन व चळवळीला जणू काही जिवंत केले आहे. टिकेत यांच्या शेतकऱ्यांसाठीच्या अश्रूंनी चळवळीची दिशा बदलली आहे. आज जाणून घेऊया त्यांच्याविषयी…
राकेश टिकेत हे दिग्गज शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकेत (चौधरी) यांचे पुत्र असून राकेशचा मोठा भाऊ नरेश आहे. नरेश हे भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. पण ही संघटना राकेशच्या ताब्यात आहे. राकेश टिकेत हे शेतकरी आंदोलन करणार्या वडिलांचे खरे वारस आहेत. सर्व निर्णय त्यांच्याद्वारे घेतले जातात आणि म्हणूनच ते युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील आहेत. एकेकाळी ते दिल्ली पोलिस दलात होते.
दिल्ली पोलिसात हवालदार :
राकेश टिकेत यांचा जन्म ४ जून १९६९. रोजी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिसौली या गावी झाला. राकेशने मेरठ विद्यापीठातून एमए केले. एलएलबी देखील केले. राकेश यांचे १९८५ मध्ये लग्न झाले. त्यांंच्या पत्नीचे नाव सुनीता असून त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. १९९२ मध्ये राकेश हे दिल्ली पोलिसात हवालदार होते. परंतु १९९३ पासून त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. १९९४ मध्ये वडील महेंद्रसिंग टिकेत यांच्या नेतृत्वात दिल्लीत आंदोलन झाले. तेव्हा अशी परिस्थिती झाली की, राकेश यांनी आपली पोलिसाची नोकरी सोडली आणि शेतकऱ्यांसमवेत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
४४ वेळा तुरूंगवास
राकेश टिकेत हे शेतकर्यांच्या हितासाठी एक-दोनदाच नव्हे तर ४४ वेळा तुरूंगात गेले आहेत. मध्य प्रदेशातील भूसंपादनाच्या विरोधात आंदोलनासाठी त्यांना ३९ दिवस तुरूंगात रहावे लागले. उसाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्यासाठी त्यांनी दिल्लीत निदर्शने केली असताना त्यांना तुरूंगात नेले, आणि बाजरीच्या वाढवी दरासाठी लढा दिल्याने पोलीस त्यांना जयपूर कारागृहात घेऊन गेले.
निवडणुकीत अपयश
पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकर्यांचे नेते (सेनापती ) असलेले राकेश टिकेत यांनी दोनदा निवडणूक लढविली आहे. परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीत त्याचे भाग्य चमकू शकले नाही. लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे.
शेतकरी चळवळीचा चेहरा
दोन महिन्यांहून अधिक काळानंतर देशभरातील शेतकरी हे नव्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर उभे आहेत. विशेषत: हरियाणा, पंजाब आणि यूपीमधील शेतकरी आंदोलन करत आहेत. पण गाझीपूर सीमा व पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी चळवळ टिकेत यांच्या आदेशावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे टिकेत यांच्या सांगण्यावरून हरियाणामधील १०० हून अधिक खेड्यांतील शेतकरी हे सुमारे १५०० ट्रॅक्टर घेऊन दिल्लीकडे रवाना झाले आहेत.