नाशिक – के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्यावतीने पाच दिवसीय शॉर्ट-टर्म प्रशिक्षण यशस्वीरित्या घेण्यात आले. अखिल भारतीय तांत्रिकी शिक्षा परिषद (ए.आय.सी.टी.ई.) यांच्या मार्फत या कार्यक्रमासाठी (एस.टी.टी.पी.) निधी देण्यात आला होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एआयसीटीईने हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने तीन टप्प्यात घेण्याची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्या अनुषंगाने या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत यशस्वीपणे पार पडला.
प्रशिक्षणाचा विषय होता ‘स्मार्ट ग्रीड मध्ये आयओटी आणि ऍडवान्सड पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा अनुप्रयोग – २०२० ‘ (“आयोटी अँड ऍडवान्सड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँप्लिकेशन्स इन् स्मार्ट ग्रीड”). या उदयोन्मुख विषयांवर भाष्य करणाऱ्या कार्यक्रमात देश विदेशातील औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिक, प्राध्यापक, संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी यांचा सहभाग होता.
बालाजी मोहन (स्नायडर इलेक्ट्रिक, बेंगलोर), डॉ. डी. एन. गावकर (एन.आय.टी. सुरथकल), डॉ. सुरेश मिकीली आणि डॉ. श्रीराज ई.एस. (एनआयटी गोवा), डॉ. चंद्रशेखर भेंडे (आयआयटी भुवनेश्वर), डॉ. प्रदीपकुमार येमुला (आयआयटी हैदराबाद), डॉ. सुरेश कुमार गावरे (एम ए एनआयटी भोपाल), डॉ. ए.महेश (एनआयटी सूरत), संतोष नानावटी (वेलॉक्स ऑटोमेशन, सूरत) आणि संजय पाल (लीग्रांड इंडिया, मुंबई) यांनी प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमातून ‘स्मार्ट ग्रीड क्षेत्रातील विविध विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले. के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ व विश्वस्त समीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर, विभाग प्रमुख डॉ. बी ई कुशारे, डॉ. रविंद्र मुंजे, प्रा. गणेश जाधव आदींनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.