डांगसौंदाणे -बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील गोपाळ सागर (केळझर) धरणावर ७५ वर्षिय वृद्धाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. देवळा तालुक्यातील हा वृद्ध असल्याची माहिती सटाणा पोलिसांनी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,आज सकाळी केळझर धरणाचे पाटबंधारे विभागाचे कर्मचारी तुळशीराम चौरे व बाळू पवार हे धरण परिसरात गेले असता त्यांना धरणाच्या मध्यावर एक मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी तात्काळ आपल्या इतर सहकार्यांना बोलवत केळझरचे पोलीस पाटील जगन चौरे तसेच सरपंच यांना वरील घटनेची माहिती दिली. त्यांनीही तात्काळ सटाणा पोलिस स्टेशनशी संपर्क साधत वरील घटनेविषयी धरणाच्या पहारेकऱ्या कडून मिळालेल्या घटनेची खबर सटाणा पोलीस स्टेशनला दिली. सटाणा पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनात डांगसौंदाणे दूर क्षेत्रावरील पोलीस प्रकाश जाधव, पो.ना. जयंतसिंग सोळंकी, पो. शि.पंकज सोनवणे, निवृत्ती भोय, राहुल शिरसाठ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत धरण परिसरातील युवकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.घटनास्थळी पंचनामा झाल्यानंतर तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी सटाणा रुग्णालयात हलविण्यात आला .यावेळी पोलिसांना धरणाच्या काठावर मयत इसमाच्या चप्पल, चष्मा ,टोपी तसेच खिशातील वस्तू आढळून आल्या. ज्यामध्ये असलेल्या आधार कार्ड वरून मयत इसम हा देवळा तालुक्यातील नामदेव गोबजी नवळे रा. विठेवाडी रोड देवळा हा असल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारावर मयताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत चौकशी केली असता ते घरी नसल्याचे आढळून आले. तसेच तसेच वारंवार ते फिरस्ते असल्याची माहिती चौकशीत समोर आली. यावेळी पोलिसांनी घडलेली हकीकत सांगत ते मयत झाल्याची माहिती देण्यात आली .
सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले असता सदर इसमाचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचे निर्वाळा वैद्यकीय अधिक्षकांनी दिला व शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह धरणातून काढल्यानंतर पोलिसांना त्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून न आल्याने व काठावर नित्य वापराच्या वस्तू मिळून आल्याने तो गृहस्थ धरणावर तोंड हात पाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून तोल जाऊन धरणात पडला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे
केळझर धरण हे बागलांणच्या पच्चीम भागातील आदिवाशी भागात असून धरणाची सुरक्षा रामभरोसे आहे. या ठिकाणी अन्य तालुक्यातील वृद्ध आलाच कसा याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे