डांगसौंदाणे, ता. सटाणा – केळझर (गोपाळ सागर) धरणाच्या डाव्या कालव्याला सोडण्यात आलेल्या पुरपाण्यामुळे साकोडे व डांगसौंदाणे शिवारातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या कालव्याला साकोडे गावाजवळ मोठी गळती असून पाटबंधारे विभागाच्या हलर्जीपणामुळे शेतपिके धोक्यात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
अनेक वेळा पाटबंधारे विभाग आणि स्थानिक शेतकरी वर्गामध्ये कालवा गळतीच्या कारणाने संघर्ष पाहायला मिळाला आहे. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने पुणे येथील देसाई कन्ट्रक्शन कंपनीला चार कोटींचे कंत्राट दिले आहे. ज्या ठिकाणी कालव्याला गळती आहे त्या ठिकाणी कालव्याला सीमेंट पाइप टाकण्याचे हे कंत्राट असून ठेकादाराने कामात हलगर्जीपणा केल्यामुळे काम बंद असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करीत आहेत.
पाटबंधारे विभागाचे वरिष्ट अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गेली अनेक वर्ष शेतीचे नुकसान होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रया शेतकरी वर्गातून उमटत आहेत. रब्बी हंगामात देखील कालव्याला मोठी गळती सुरू झाल्याने स्थानिक आदिवासी शेतकरी वर्गाने आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे तक्रार केली होती. बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे- पाटिल, पाटबंधारे विभागाचे अभियांता अभिजीत रौंदळ, संजय पाटील आदींनी नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी करीत चार महिन्यात कालवा दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वर्ष उलटून गेल्यावर ही काम पूर्ण न झाल्याने आज परत कालव्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे खरीपाचा मका, कोबी, उडीद, मुग पूर्णपणे खराब झाला आहे. काढणीस आलेली पिके या कालवा गळतीने खराब झाल्याचे समोर आले आहे.
—
केळझर कालव्यातून पाणी जाण्यास आमचा विरोध नाही मात्र पाण्याच्या गळतीला कायमस्वरूपी बंद केले पाहिजे आमच्या शेत पिकांचे दरवर्षी मोठे नुकसान होते
– विश्वनाथ गांगुर्डे, शेतकरी, साकोडे
—
पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांचे कायम होणारे नुकसान लक्षात घेता संबंधीत ठेकेदाराला नोटिस देत काम तत्काळ करण्याच्या सुचना कराव्यात व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत सबंधित ठेकेदाराकडून नुकसान भरापाई शेतकऱ्यांना मिळवुन द्यावी अन्यथा रब्बी हंगामात या कालव्यातून पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला जाईल.
– गणेश आहिरे, जिल्हा परिषद सदस्य,पठावे दिगर गट
—
साकोडे येथील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने चार महिन्यात काम पूर्ण करण्याच्या शब्द दिला होता काही तांत्रिक अडचणीमुळे काम बंद पडले असेल तर माहिती घेऊन पुरपाणी तत्काळ बंद करण्याच्या सुचना देण्यात येतील.
– जितेंद्र इंगळे -पाटील, तहसीलदार
—
कालव्यातून पाण्याची ठिठिकाणी होतअसलेली गळती कमी करण्यासाठी प्लास्टिक कागदचे आच्छादन करण्यात आले आहे व जेसीबीच्या सहाय्याने कालव्यातील अडथळे दूर करण्यात येत आहेत. कोरोनामुळे काम थांबले असून लवकरच काम हाती घेण्यात येइल.
– अभिजीत रौंदळ, अभियंता, पाटबंधारे विभाग