इगतपुरी – बोरटेंभे शिवारात बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. डोंगरावर हा मृतदेह होता. तीन वर्षांच्या नर बिबट्याचा हा मृतदेह असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पावसामुळे झाला की अन्य काही कारणाने याचा शोध वनविभागाकडून सुरू आहे. एका हॉटेलसमोर गुराख्यांसह ग्रामस्थांना बिबट्या मृतावस्थेत दिसला. त्यांनी तातडीने वनविभागाला कळविले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पोपट डांगे, के. के. हिरे, आर. बी. आगिवले, मुजिद शेख घटनास्थळी दाखल झाले. हा बिबट्याचा मृतदेह तीन ते चार दिवसांपासून असावा असा अंदाज आहे. वनविभाग अधिक तपास करीत आहे.