तिरुअनंतपुरम – सोनं तस्करी प्रकरणातील आरोपी युवती स्वप्ना सुरेश हिनं अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) खळबळजनक माहिती दिली आहे. केरळच्या विधानसभेचे अध्यक्ष पी श्रीरामकृष्णन हे आपल्याला अनैतिक कामांसाठी फ्लॅटवर बोलवत होते, असा आरोप तिनं केला आहे. याबाबत तपास यंत्रणांनी केरळ उच्च न्यायालयात काही कागदपत्रे सादर केले आहेत. त्यानंतर ही माहिती समोर आली.
स्वप्ना सुरेशनं आरोप केला की, श्रीरामकृष्णनन तिला तिरुअनंतपुरमच्या पेट्टाममधील एका फ्लॅटवर बोलवत होते. तो फ्लॅट त्यांच्या ताब्यात होता. परंतु दुसऱ्याच्या मालकीचा होता. स्वप्नाला विचित्र वाटू नये म्हणून तिला फ्लॅटच्या मालकाबाबत सांगितलं होतं.
स्वप्ना सुरेशचा जबाब एका अतिरिक्त कागपत्राच्या रूपानं सादर करण्यात आला आहे. स्वप्नानं ईडीच्या उपसंचालक यांच्यासमोर अटाकुलंगराच्या वनिता कारागृहात १६ डिसेंबर २०२० रोजी जबाब दिला होता. जबाबानुसार, त्यांनी मला फ्लॅटच्या खऱ्या मालकाबद्दल सांगितलं जेणेकरून मला सुरक्षित वाटेल. त्यानंतर मी नकार दिला, तेव्हा त्यांनी ओमानमध्ये तिला नोकरी देण्यास नकार दिला. त्यांनी तिथं गुंतवणूकही केली आहे.
केरळमध्ये एलडीएफ सरकार केंद्रीय तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना याबाबत खुलासा झाला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय हेतूनं या प्रकरणाचा तपास करत आहे, असा आरोप श्रीरामकृष्णन म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी शारजाहमधील ओमानमध्ये मिडल ईस्ट महाविद्यालयाची एक शाखा उघडण्याचा निर्णय घेतला होता. असं स्वप्नानं तपास यंत्रणांना सांगितलं. परंतु तिचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत श्रीरामकष्णन यांनी या दाव्यांना फेटाळलं होतं.