नवी दिल्ली ः कोरोना संसर्गाविरोधात जिंकण्याच्या उद्दिष्टाकडे भारत वेगानं पुढे जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीत आतापर्यंत १० ते १२ हजार नवे रुग्ण आढळत आहेत. तरीही महाराष्ट्र आणि केरळमध्ये परिस्थिती अद्याप चिंताजनकच आहे. महाराष्ट्रानंतर केरळमध्ये रुग्णांची संख्या १० लाखांजवळ पोहोचली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १४ फेब्रुवारी सायंकाळपर्यंत केरळमध्ये ९ लाख ९९ हजार ५२४ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या २०.६० लाखांवर गेली आहे. देशातल्या सर्वात अधिक संसर्गग्रस्त राज्यांमध्ये महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या दुपटीहून अधिक आहे. परंतु लोकसंख्या आणि रुग्णसंख्या यामध्ये खूप मोठं अंतर आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत कोविडचे ९.४४ लाख रुग्ण आढळले असून कर्नाटक तिस-या स्थानी आहे.
सहा राज्यात ८६ टक्के रुग्ण
आकडेवारीनुसार, कोरोनारुग्ण दररोज आढळण्याचे प्रमाण सहा राज्यांमध्ये ८६ टक्के आहे. गेल्या चोवीस तासात केरळमध्ये सर्वाधिक ५४७१ रुग्ण, तर महाराष्ट्रात ३६११ नवे रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूनमध्ये ४७७, कर्नाटकमध्ये ४१९, गुजरात २७९ आणि पंजाबमध्ये २६० रुग्ण आढळले आहेत.
कोरोना रुग्णांची इतर राज्यातली स्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सांगितले, की मागील २४ तासात १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोविडमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. तेलंगण, ओदिशा, झारखंड, पुद्दुचेरी, चंदिगड, नागालँड, आसाम, मणिपूर, सिक्किम, मेघालय, लडाख, मिझोरम, अंदमान निकोबार बेट समुह, त्रिपुरा, लक्षद्वीप, अरुणाचल प्रदेश आणि दीव-दमण तसंच दादर नगर हवेली मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. तसंच १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोविडमुळे एक ते पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.