तिरुअनंतपुरम – केरळमध्ये निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच काँग्रेसमध्ये असंतोष वाढू लागला आहे. केरळच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा लतिका सुभाष यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एत्तूमनूर विधानसभा जागेचं तिकीट न मिळाल्याने लतिका सुभाष नाराज होत्या. तिरुअनंतपुरम इथल्या काँग्रेस कार्यालयाबाहेर लतिका सुभाष यांनी मुंडन करून निषेध नोंदवला.
नवी दिल्लीमध्ये केरळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर लतिका सुभाष यांनी तिरुअनंतपुरममधील पक्षाच्या मुख्यालयात सांगितले, की यादीमध्ये महिलांची संख्या कमी आहे. ८६ उमेदवारांमध्ये फक्त ९ महिला उमेदवार आहेत. जे पद मला साधं तिकीट देऊ शकत नाही, अशा पदावर राहण्यास मी इच्छुक नाही, असे म्हणत लतिका सुभाष यांनी संताप व्यक्त केला.
लतिका सुभाष यांनी २०१८ मध्ये महिला काँग्रेस अध्यक्षाचं पद सांभाळले होते. महिलांचे प्रतिनिधित्व करून मी सर्व महिलांच्या वतीने निषेध करत मुंडन करून घेतले, असे त्या म्हणाल्या. मी उमेदवारांच्या यशासाठी कठोर मेहनत करत आलेले आहे. पक्ष नेतृत्वानं माझ्याकडे दुर्लक्ष करून मला बाजूला केले आहे. आम्ही महिलांसाठी २० टक्के जागा मागितल्या होत्या. या वेळी प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी एक महिला उमेदवार असेल अशी अपेक्षा होती. परंतु ज्या महिला पक्षासाठी काम करत होत्या त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. मी पक्षासाठी अनेक वर्षांपासून काम करत आहे. पक्षाचे अनेक आमदार माझ्यापेक्षा ज्युनिअर आहेत. या सर्व परिस्थितीत मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.