नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पुन्हा सत्ता प्रास्थापित केल्यानंतर आता ते मुंबई जिंकण्याची तयारी करत आहेत. म्हणूनच आम आदमी पार्टीने आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर नजर ठेवली आहे.
आम आदमी पक्षाने मुंबईतील मनपावर झेंडा फडकविण्यासाठी विशेष ध्येयधोरणांवर जोर दिला आहे. यासाठीच केजरीवाल यांनी त्यांच्या टीममधील अक्षय मराठे यांच्याकडे मुंबईची जबाबदारी सोपविली आहे. ते मुळचे मुंबईचेच आहेत. केजरीवाल यांच्या पुन्हा सत्ता विजयात त्यांचा मोलाचा वाटा आहे. दिल्लीतील आर्थिक आणि नाविन्यपूर्ण राबविलेले प्रयोग मुंबईत लागू करण्यासाठी आपने कंबर कसली आहे.
आप नेत्या व आमदार आतिशी यांनी सांगितले की, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघेही मुंबईकरांना फसवत आहेत. कारण हॉस्पिटल, शिक्षण आणि स्वच्छता इत्यादी मूलभूत बाबी अद्याप सर्व मुंबईकरांना मिळत नाहीत, त्यामुळे आमचा पक्ष हा मुद्दा निवडणूक प्रचाराचा एक भाग बनवतील. तसेच महापालिकेच्या निवडणुकांची पूर्वतयारी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
रोडमॅपची तयारी
मुंबई मनपा निवडणुकीसाठी ‘आप’ द्वारा रोडमॅप तयार केला जात आहे. महापालिकेच्या सर्व २२७ जागांवर निवडणूक लढविण्यासाठी पक्षाने स्वयंसेवकांकडून यापूर्वीच अर्ज मागवले आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीत कोकण अकादमीची स्थापना करून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मुंबईला मोठा संदेश दिला आहे. खरं तर हा शिवसेनेच्या वोट बँकला शह देण्याचा प्रयत्न आहे. कोकणी भाषा ही गोव्याची अधिकृत भाषा असून ती मुंबईच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड इत्यादी जिल्ह्यात बोलली जाते. मुंबईत सध्या कोकणातील सर्वाधिक व्यक्ती राहतात. त्यांच्या बळावरच २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची महापालिकेत सत्ता आहे. कोकणातील या मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘आप’ ने दिल्लीत कोकण अकादमीची स्थापना केली आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.