मनाली देवरे, नाशिक
……
शनिवारी झालेल्या दोन साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स ने दिल्ली कॅपीटल्स संघाचा ५९ धावांनी पराभव केला तर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सनरायझर्स हैद्राबादचा १२ धावांनी पराभव करून दिवस गाजवला.
कोलकाता नाईट रायडर्सच्या या सिम्मोलंघनानंतर गुणांच्या टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाच्या दुस–या क्रमांकाच्या स्थानाला सध्या जरी धक्का पोहाचलेला नसला तरी चवथ्या स्थानावर विराजमान असलेल्या केकेआरला हटवून हे स्थान मिळविण्यासाठी डोळे लावून बसलेल्या इतर संघाना मात्र मोठा झटका बसला आहे. तिकडे सलग तीन विजय प्राप्त करून गुणांच्या टेबलवर मुंसडी मारणा–या पंजाबला सनरायझर्स हैद्राबाद मागे खेचणार असे वाटत असतांनाच शेवटच्या काही षटकात पंजाबने पुन्हा मुसंडी मारली आणि एक आश्चर्यकारक विजय संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर आयपीएल मध्ये संभाव्य नॉकऑउटची प्रक्रिया आता सुरू झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. या स्पर्धेतले आव्हान जवळपास संपण्याच्या बाबतीत शुक्रवारी चेन्नईचा नंबर लागला होता. आता शनिवारच्या निकालानंतर, सनरायझर्स हैद्राबाद संघ देखील गोत्यात आला आहे. या दोन संघांखेरीज राजस्थान रॉयल्स संघाचे भवितव्य देखील अधांतरीच राहीले असून काही चमत्कार किंवा उलटफेर झाले तरच आता, आहे त्या स्थिती मध्ये काही बदल बघायला मिळतील असा जाणकांराचा अंदाज आहे.
केकेआर वि. दिल्ली कॅपीटल्स
या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करतांना १९४ धावाचे भलेमोठे आव्हान दिल्ली कॅपिटल्सला दिले होते. नितीश राणाच्या व्यक्तीगत ८१ धावा आणि मधल्या फळीत या सिझनमध्ये प्रथमच तळपलेली सुनील नारायणची बॅट यामुळे हा धावांचा डोंगर केकेआरला रचता आला. परंतु, हा डोंगर पार करण्याच्या प्रयत्नात दिल्ली कॅपीटल्स सारखा फलंदाजीत अव्वल असलेला संघ सपशेल अपयशी ठरला. दिल्लीला २० षटकात १३५ धावांपर्यन्तच मजल मारता आली आणि त्यासाठी त्यांना ९ बळी गमवावे लागले. अंजिक्य रहाणे आणि शिखर धवन यांचे सलामीचे अपयश आणि श्रेयस अय्यर (४७ धावा) सह रिषभ पंत (२७ धावा) यांना मोठी खेळी उभारण्यात आलेले अपयश हे दिल्लीसाठी पराभवाचे कारण बनले. परंतु, केकेआरच्या वरूण चक्रवर्तीने ४ षटकात अवघ्या २० धावा देवून घेतलेले ५ बळी या सामन्यात निर्णायक ठरले. वरूण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.
किंग्ज इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स
सनरायझर्स ने टॉस जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाबला पहिल्यांदा फलंदाजी बोलावले होते. के.एल. राहूल आणि ख्रिस गेल यांचा समावेश असलेला संघ फलंदाजीतला किंग म्हणून समजला जात असतांनाच या संघाचे धाबे सनरायझर्स च्या संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि रशीद खान या गोंलदाजांसमोर दणाणले आणि त्यांनी २० षटकात अवघ्या १२६ धावा केल्या. खरेतर हे टारगेट सनरायझर्ससाठी फारसे कठीण नव्हतेच. डेव्हीड वॉर्नर, जॉन बेअरस्टो या सलामीच्या फलंदाजाखेरीज मधल्या फळीतला विजय शंकर यांनी संयमाने फलंदाजी करून हा विजय आवाक्यात आणला देखील होता. ३१ चेंडून ३१ धावांचे आव्हान आणि ७ फलंदाज शिल्लक असतांना या मॅचचे पारडे फिरले आणि तिथून सनरायझर्ससाठी पराभवाची दरी सुरू झाली. अर्शदीप सिंगने आणि ख्रिस जॉर्डन यांनी गोलंदाजीचा अप्रतिम नमुना पेश करून सनरायझर्सचे धैर्य १९.५ षटकात सर्वबाद ११४ या धावसंख्येवरच संपवले.
रविवारच्या लढती
डबल धमाका पॅकेज मध्ये रविवारी दोन सामने खेळविण्यात येतील. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुबईतून दुपारी ३.३० वाजता थेट बघायला मिळेल तर राजस्थान रॉयल्स विरूध्द मुंबई इंडियन्स या दोन संघाची अबुधाबी येथे होणारी लढत संध्याकाळी भारतीय प्रमाणवेळेनुसार ७.३० वाजता सुरू होईल.