मनाली देवरे, नाशिक
……
आज हातातोंडाशी आलेला विजय चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे कोलकत्ता नाइट रायडर्सच्या पदरात विजय जाऊन पडला, आणि १० धावांनी हा सामना जिंकून केकेआरने सगळ्यांनाच चकीत केले. चेन्नई संघावर बाजी पलटवतांना केकेआरच्या गोलंदाजांनी केलेले प्रदर्शन हे विजयासाठी समर्पक ठरले.
१६ व्या षटकात महेंद्रसिंग धोनी बाद झाला त्यावेळेला चेन्नई सुपर किंग्ज संघ सुस्थितीत होता. १२९ धावा फलकावर झळकलेल्या होत्या आणि फक्त ४ गडी तंबूत पोहोचलेले होते. परंतु, एका अप्रतिम चेंडूवर महेंद्रसिंग धोनी आणि त्यानंतर अवघा संघच क्लिन बोल्ड झाला असे म्हणायला हरकत नाही. वरूण चक्रवर्ती, कमलेश नागरकोटी, सुनील नारायण आणि अवघ्या २ ओव्हर्स टाकणारा आंद्रे रसेल यांच्या लाजबाब गोलंदाजीने सीएसकेच्या हातात असलेला विजय हिरावून घेतला.
किंग्स इलेवन विरुद्ध नाबाद ८३ आणि आज केकेआर विरुध्द ५० धावा, शेन वॉटसनला फॉर्म गवसला ही आयपीएल मधल्या सध्याच्या सगळ्या टीमसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे.
कोलकात्याची समतोल फलंदाजी
अगदी काही दिवसापूर्वीच सीएसकेने एकही गडी न गमावता सामना जिंकला होता. ही आठवण ताजी असूनही सीएसकेच्या फलंदाजीतली धावांचा पाठलाग करण्याची क्षमता न ओळखता आज केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला होता अर्थात, या निर्णयाला न्याय देवून १६७ धावांचे एक माफक आव्हान त्यांनी विजयासाठी सीएसके समोर ठेवले खरे. परंतु टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना विजयासाठी गोलंदाजांवर असलेला कार्तीकचा विश्वास कामी आला.
राहुल त्रिपाठी यांच्या ५१ चेंडुतल्या ८१ धावा सोडल्या तर कोलकात्याच्या इतर सगळ्याच फलंदाजांनी खेळपट्टीवर फक्त हजेरी लावली परंतु वैयक्तिक योगदान मात्र दिलेच नाही. ब्राव्होने घेतलेले ३ बळी आणि सॕम करण, शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा यांचे प्रत्येकी २ बळी चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य ठरले.
शुक्रवारचा सामना
या सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणा-यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेला के.एल. राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबचा. याच यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला मयंक अग्रवाल, तो देखील पंजाब संघाचाच. सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या १० गोलंदाजांमध्ये असलेले मोहम्मद शमी शेल्डन कॉट्रेल हे देखील पंजाबचेच. परंतु ज्या वेळेला सांघिक कामगिरी बघितली जाते त्या वेळेला किंग्ज इलेव्हन पंजाब संघ गुणांच्या टेबलमध्ये मात्र ५ पैकी अवघा १ सामना जिंकून तळाला असल्याचा दिसून येतो. शुक्रवारी या संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद सोबत होईल. सनरायझर्सची अवस्था देखील फार चांगली आहे अशातला भाग नाही. त्यांनी देखील ५ पैकी अवघे २ सामने जिंकले आहेत.