लासलगांव – कांद्याचे दर वाढताच केंद्रसरकारने तत्परता दाखवत निर्यात बंदी लागू केली आज कांद्याचे दर २ हजार रुपयांच्या घरात आलेले असतांना केंद्र सरकार कांदा निर्यात खुली करण्यासाठी तत्परता दाखवणार का ? असा सवाल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केला असून याबाबत कांदा निर्यात तातडीने खुली न झाल्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राज्यभरातील बाजार समित्यांशी संपर्क साधून या मागणीसाठी बेमुदत बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल असा ईशारा होळकर यांनी दिला आहे.
कांदा निर्यात तातडीने खुली करावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असूनही याबाबत सकारात्मक प्रतिसाद केंद्र सरकारकडून मिळत नसल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निर्यात खुली होण्यासाठी केंद्राकडे हस्तक्षेप करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शुक्रवारी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की १४ सप्टेंबर रोजी कांद्याचे दर ५ हजार रुपयांपर्यंत गेल्याने केंद्रसरकारने अत्यंत तातडीने निर्यात बंदी लागू केली. त्यानंतर कांद्याचे दर वाढू नये म्हणून व्यापारी वर्गावर प्राप्तीकर विभागाची छापेमारी, तसेच साठवणुकीवर मर्यादा व कांद्याचे दर आणखी कमी करण्यासाठी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम सध्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या बाजार भावांवर झाला असून कांद्याचे दर आता २ हजार रुपयांच्या आसपास आले आहेत.
परतीच्या पावसाने लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने कांद्याला समाधानकारक दर मिळणे गरजेचे आहे. आज कांद्याला जो दर मिळत आहे त्यातून शेतकऱ्यांचा जेमतेम झालेला खर्च भरून निघणार असल्याने आज कांद्याचे घसरलेले दर लक्षात घेता तातडीने कांदा निर्यात खुली करण्याची गरज असून निर्यात खुली झाल्यास कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याने केंद्राने तातडीने निर्यात करावी यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी जयदत्त होळकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
तातडीने कांदा निर्यात खुली न झाल्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राज्यभरातील बाजार समित्यांशी संपर्क साधून या मागणीसाठी बेमुदत बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल असा ईशारा जयदत होळकर यांनी दिला आहे.