जळगाव ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसताच स्वत: कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोनाची चाचणी करून घेऊन तात्काळ इलाज करून घेतल्यास मृत्यूदर नक्कीच कमी होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करतानाच आरोग्य प्रशासनानेही चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास नियुक्त जिल्हास्तरीय बैठक श्री.कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हयातील कोरोनाबाबतची एकंदरीत स्थिती. व त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपायोजना व त्यातून मिळालेले यश याची सविस्तरपणे माहिती सादर केली.महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती व मिळालेले यश महानगर पालिकेचे आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी ग्राफिकच्या माध्यमातून सादर केली. केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून कारोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त करून अजून अधिक जोमाने व समन्वाने काम करण्याच्या अपेक्षा व्यक्त केली.
प्रतिबंधित क्षेत्रास भेटी
केंद्रीय पथकाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीपूर्वी शहरातील कार्तीक नगर,शिवाजी नगर येथील प्रतिबंधात्मक क्षेत्रांची पाहणी केली तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलला भेट दिली व तेथील रुग्णांची पाहणी करून औषधोपचाराची माहिती जाणून घेतली पाहणीनंतर पथकाने जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोनांबाबत संबंधित यंत्रणांना सूचना केल्या.