मुंबई – देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रित असताना राज्यात रुग्णसंख्या वाढल्याने यंत्रणा दक्ष झाली आहे. राज्यात कोरोनारुग्णांची संख्या का वाढत आहे, याबाबत केंद्र सरकारच्या पथकानं पाहणी केली. या पाहणीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या जाणून घेऊ.
का वाढली रुग्णसंख्या
केंद्राच्या पथकाच्या पाहणीनंतर कोरोना संपला आहे, असं समजून लोकांचा निष्काळजीपणा वाढला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांची वाढलेली संख्या, मुंबईतील लोकलसह सार्वजनिक वाहतूक सुरू झाल्यानं रुग्णसंख्या वाढत असल्याचा अहवाल पथकानं दिला आहे. लोकलमधल्या गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढल्याचं महत्त्वाचं कारण सांगण्यात आलं आहे.
आरोग्य यंत्रणासुद्धा खूप गांभीर्यानं काम करत नसल्याचं निरीक्षण पथकानं अहवालात नमूद केलं आहे. केंद्रीय आरोग्य सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या पथकानं १ आणि २ मार्चला कोरोना पाहणी दौरा केला होता.
केंद्रीय पथकाच्या सूचना
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारनं कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे, रुग्णांचा शोध घेतला पाहिजे, नियमांचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे, अशा सूचना केंद्रीय पथकानं केल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देतानाच लसीकरणही सुरू ठेवावं अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यातली कोरोनाची स्थिती
७ मार्चला राज्यात ११,१४१ कोरोनारुग्णांची नोंद झाली असून, ६०१३ रुग्ण बरे झाले आहेत. सक्रीय रुग्णांची संख्या वाढून ९७,९८३ झाली आहे. राज्यात एकूण बाधितांची संख्या आता २२,१९,७२७ पर्यंत वाढली आहे. आतापर्यंत ५२,४७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रविवारी १३६१ रुग्ण आढळले आहेत.