नाशिक – कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्रीय पथकाकडून नाशिकमधील जिल्हा रुग्णालय, हॉटस्पॉटसह कोरोना संशयितांची चाचणी करणाऱ्या लॅबची पाहणी केली. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही गेल्या महिनाभरात संसर्ग वाढल्याने त्रिसदस्यीय केंद्रीय समितीने मंगळवारी (दि.९) पाहणी करीत आढावा घेतला.
ज्या राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्या राज्यातील कारणे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने पथकांची नियुक्ती केली आहे. त्याच अनुषंगाने हे केंद्रीय पथक ज्या जिल्ह्यात बाधित आढळण्याचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे कारणे जाणून घेत आहेत. नाशिक जिल्ह्यात ७ फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसते. तर मार्च मध्ये दररोज सरासरी ४०० ते ६०० बाधित आढळून येत असून बाधितांचा मृत्यूदरही वाढला आहे. त्यामुळे राज्यात आलेल्या केंद्रीय पथकातील त्रिसदस्यीय समितीने मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन तेथील कोव्हिड कक्षाची त्याचप्रमाणे लॅबची पाहणी केली. त्यानंतर शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी जाऊन तेथील आढावा घेतला. तसेच आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयातही पाहणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे, रुग्णांच्या संपर्कातील संशयितांची चाचणीचे प्रमाण याबाबत समितीने आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. रत्ना रावखंडे यांच्यासह डॉ. प्रमोद गुंजाळ व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. समितीकडून केलेल्या पाहणीचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर होणार आहे.