नाशिक – देशातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ट्रान्सपोर्ट उद्योगाला यंदाच्या अर्थसंकल्पातून सावरण्यासाठी काही तरी ठोस मिळेल अशी अशा होती. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात ट्रान्सपोर्ट क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व ट्रान्सपोर्ट क्षेत्राची घोर निराशा झाली असून या अर्थसंकल्पाचा आम्ही जाहीर निषेध करतो अशी प्रतिक्रिया नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी व्यक्त केली आहे.
अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया व्यक्त करतांना राजेंद्र फड यांनी म्हटले आहे की, कोरोना नंतरच्या काळात ट्रान्सपोर्ट उद्योग हा पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. त्यात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डीझेलच्या दरात वाढ होत असल्याने हा व्यवसाय करणे देखील अवघड होऊन बसले आहे. त्यात यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोल डीझेलवर पुन्हा कृषी अधिभार लावण्यात आला आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा ग्राहकावर होणार नाही असे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात त्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला यातून अधिक त्रस्त होणार असून हा उद्योग करणे आता ट्रान्सपोर्ट चालकांना अतिशय कठीण होणार आहे. तसेच याचा परिमाण सर्वच क्षेत्रावर होणार असल्याचे राजेंद्र फड यांनी म्हटले आहे.