नाशिक – शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भाजपसोबत आहे. मात्र कांदा निर्यातबंदीचा निर्णय हा शेतकरी विरोधी, त्यामुळे भाजप सोबत असलो तरी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे रयत क्रांती संघटनेचे नेत सदाभाऊ खोत यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत सांगितले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे तीव्र आंदोलनं छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेऊन केंद्रानं शेतकऱ्यांसोबत मोठा विश्वासघात केला, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुडदा पाडला असेही ते म्हणाले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता कुठे थोडा फायदा होत होता आणि केंद्राने तातडीने निर्यातबंदी केली. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक, अविचारी निर्णय आहे. मुंबई पोर्टसह अन्य सीमांवर थांबवलेले कंटेनर ताबडतोब परदेशात पाठवण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यातल्या सर्व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र यावे असे आवाहन केले.
शेतीचं १०० टक्के सरकारीकरण करा
यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्राने शेतीचं १०० टक्के सरकारीकरण करा, काय लावायचं ते तुम्ही ठरवा, आम्हाला आमच्याच शेतात काम करण्याची नोकरी द्या, आम्हाला फक्त पगार द्या असेही सांगितले.आमची शेती सरकारच्या मालकीची करतो, काय पिकवायचं, कोणतं बियाणं वापरायचं सर्व काही सरकारनंच ठरवावं.