नवी दिल्ली/नाशिक – नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा या हेतूने केंद्र सरकारने सायकल फॉर चेंज चॅलेंजला देशभरात सुरूवात केली. त्यात नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहरही सहभागी झाले आहे. पहिल्या टप्प्यात ४१ शहरांपैकी २५ शहरांची निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील नाशिकसह नागपूर, औरंगाबाद आणि पिंपरी चिंचवड या शहरांचा समावेश आहे.
दरम्यान, सदर स्पर्धा सुरू झाल्यापासून नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत विविध स्तरावर विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्यामध्ये अशोक स्तंभ ते पपाया नर्सरी (दोन्ही बाजुने) पॉप अप सायकल ट्रॅक प्रस्तावित करण्यात आला आहे, सदर पॉप अप सायकल ट्रॅकवर हँडल बार सर्वेक्षण घेण्यात आले, महात्मा गांधी जयंती निमित्त सायक्लॉथॉन घेण्यात आला, सायकल असोसिएशन्स व स्वयंसेवी संस्था तसेच निमा, आयमा, क्रेडाईसह विविध संस्थांसोबत वेबिनार व बैठका घेण्यात आल्या.
त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात ज्या शहरांची निवड होईल त्या शहरांना इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज या उपक्रमाअंतर्गत शहरामध्ये सायकलींग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी १ कोटी रुपये मिळणार आहेत.
खासगी वाहतुकीला सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर ऑफीस, शाळा आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी तसेच लहान मुले, वृद्ध यांच्यासाठीही सायकलींग सुरक्षित पर्याय असून, गरिब, श्रीमंत कुणीही सहज सायकल खरेदी करू शकते. लॉकडाऊनच्या काळामध्ये अचानक झालेली सायकलींगची वाढ अशीच कायम रहावी व त्यात वाढ व्हावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सायकलचा पर्यावरणपूरक, आरोग्य संवर्धक असाही उपयोग होतो. सायकलच्या वापराने मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होण्यास मदत होईल.