नाशिक – प्रत्यक्षात एकदाही न्यायालयात हजर न राहता कॅलिफॉर्निया येथील युवकाला कौटुंबिक न्यायालयाने संमतीने ऑनलाईन घटस्फोट देण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने झालेला हा पहिलाच घटस्फोट आहे.
शहरातील एक युवक विवाहानंतर नोकरीसाठी अमेरिकेतील कॅलिफॉर्निया येथे पत्नीसह गेला होता. दोघांमध्ये वाद झाल्याने पत्नी भारतात आली होती. तिने पतीकडे परत जाण्यास नकार दिला. तसेच, घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयात दाखल केला. पती कॅलिफॉर्नियातच होता. दरम्यान दोघांमध्ये समझोता होऊन दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यातच कोरोनामुळे पती भारतात येऊ शकला नाही. त्याने अमेरिकेतूनच प्रतिज्ञापत्र करुन पाठविले. त्याच्या वडिलांनी न्यायालयास मुखत्यारपत्र सादर केले. न्यायालयाने पतीस ऑनलाईन विचारणा केली. त्यानंतर संमतीने दोघांनाही घटस्फोट मंजूर केला. न्यायमूर्ती शिल्पा तोडकर यांनी निकाल दिला. कॅलिफॉर्नियातील युवकातर्फे अॅड धर्मेंद्र चव्हाण यांनी तर नाशिक शहरात असलेल्या पत्नीतर्फे अॅड शाम गोसावी, अॅड दिनेश शिंदे यांनी काम पाहिले.