नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे ई-छावणी पोर्टल आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन केले. देशभरातील ६२ छावणी मंडळांमध्ये राहाणाऱ्या २० लाखांपेक्षा जास्त रहिवाशांना ऑनलाईन नागरी सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने (https://echhawani.gov.in/) हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.
या पोर्टलच्या मदतीने छावणी क्षेत्रात राहाणाऱ्या रहिवाशांना जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळवणे, पाण्याचे कनेक्शन आणि सांडपाणी व्यवस्था जोडणी, भाडे कराराचे नूतनीकरण करणे, व्यापार परवाना, फिरत्या स्वच्छतागृहांच्या स्थानांची माहिती मिळवणे आणि विविध प्रकारचे कर आणि शुल्क चुकते करणे यांसारख्या मूलभूत सेवा केवळ एका बटणाच्या क्लिकद्वारे उपलब्ध होणार आहेत. ई-जीओव्ही फाउंडेशन, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, संरक्षण मालमत्ता महासंचालनालय आणि नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर यांनी या रहिवाशांना घरबसल्या या सेवा मिळवता याव्यात यासाठी संयुक्तपणे हे पोर्टल तयार केले आहे.
प्रशासन अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक करून लोकांना जास्तीत जास्त सुविधा देऊन देशाचा सामाजिक आर्थिक विकास करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला. सर्व प्रणाली नागरिकांना अनुकूल करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुकर करणाऱ्या आणि कामे सोपी करणाऱ्या सेवा पुरवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
सुशासनला आणि लोकाचे जीवन सुकर करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी ‘किमान सरकार-कमाल शासन’, डिजिटल इंडिया आणि ई- गव्हर्नन्स यांसारख्या उपक्रमांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली, असे राजनाथ सिंह म्हणाले. ई-छावणी पोर्टल हे या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.
छावणी मंडळांच्या कार्यपद्धतीत न्यू इंडियाच्या दृष्टीकोनाला अनुरूप असे परिवर्तन घडवून आणणारे हे पोर्टल आहे आणि त्यामुळे या भागात राहाणाऱ्या रहिवाशांना मिळणाऱ्या सेवांच्या कार्यक्षमतेत आणि पारदर्शकतेत वाढ होऊन त्यांना त्या वेळेवर उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे पोर्टल अधिक नागरिक- स्नेही बनवण्यासाठी या पोर्टलच्या लाभार्थ्यांकडून वेळोवेळी त्याबाबतचे अभिप्राय मिळवत राहा, अशी सूचना राजनाथ सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
गेल्या काही वर्षात भारत एक जागतिक उर्जाकेंद्र बनला आहे आणि संरक्षण, आर्थिक क्षेत्र, व्यापार, माहिती तंत्रज्ञान, कृषी आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये आपले ठळक अस्तित्व निर्माण केल्यामुळे गुंतवणूक संधींची भूमी बनला आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. तुमच्या मोबाईल फोनवर ई-छावणी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक डाऊनलोड करा