नवी दिल्ली – मुदत संपलेल्या आणि संपत असलेल्या देशभरातील कॅन्टॉन्मेंट बोर्डांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने निर्देश जारी केले आहेत. कोरोना महामारीमुळे कॅन्टॉन्मेंट बोर्डाच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीसाठी आवश्यक मतदार यादी तयार करणे व प्रसिद्ध करण्याचेही थांबले होते. मात्र, आता संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, येत्या ३० एप्रिलपर्यंत कॅन्टॉन्मेंट बोर्डांना मतदार यादी प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यानंतर लगेच निवडणुका होणार आहेत. परिणामी, येत्या उन्हाळ्यात कॅन्टॉन्मेंट बोर्डातील राजकीय वातावरण निवडणुकीमुळे तापलेले राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.