नवी दिल्ली – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा मनोरंजनाला सज्ज झाला आहे. यातील काही कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. यातीलच एक कृष्णा अभिषेक. कृष्णा अभिषेक अर्थात शोमधील सपना आणि कपिल यांची जुगलबंदी लोकांना आवडते आहे. मात्र, नुकतीच कृष्णा अभिषेक याने हा कार्यक्रम सोडण्याची धमकी दिली आणि चर्चेला उधाण आलं.
पण ही निव्वळ एक अफवा आहे. असे काहीही होणार नाही. शो सोडण्याची धमकी आपण गंमतीत दिल्याचे कृष्णा अभिषेकने स्पष्ट केले आहे. या शोमध्ये रेमो डिसूजा आले असताना हा प्रकार घडला. सपना (कृष्णा अभिषेक) यावेळी डान्स करत शोमध्ये एंट्री घेते. रेमोला पाहून ती नाराज होते आणि आपण हा शो सोडून जात असल्याचे सांगणारा प्रोमो निर्मात्यांनी रिलीज केला आहे. यावरूनच ही चर्चा सुरु झाली. तिच्या या म्हणण्यावर कपिल शर्मा तिला याचे कारण विचारतो. यावर कृष्णा अनेक गमतीशीर उत्तरे देतो. तसेच रेमोबद्दल म्हणतो की, यांनी आजपर्यंत इतक्या बॅकग्राउंड डान्सर्सना स्टार बनवलं, पण मला काही संधी दिली नाही. ते काहीही असलं तरी आता कृष्णा अभिषेक का शो सोडून जाणार नसून यामुळे प्रेक्षकांना दिलासा मिळाला आहे. आणि या चर्चेला पूर्णविरामही.