मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते ‘जयंत ॲग्रो २०२१’ या व्हर्च्युअल कृषी प्रदर्शनाचा अनावरण सोहळा आज पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेस सांगलीचे शहराध्यक्ष संजय बजाज व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या संकल्पनेतून या व्हर्च्युअल कृषी प्रदर्शनात ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या बांधावर एका टचवर कृषी क्षेत्रातील माहिती मिळेल, शेतीविषयक गोष्टींची खरेदी विक्री करता येईल. प्रगल्भ शेतकऱ्यांच्या मुलाखती पाहता येतील तसेच तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळेल. शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व काही उपलब्ध करून देणारे हे पहिलेच व्यासपीठ आहे.
कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी माझे सहकारी जयंत पाटील यांनी कृषी क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे, शेतकऱ्यांना सोयीस्कर शेती करता यावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या वाढदिवशी या उपक्रमाचे अनावरण करताना अत्यंत आनंद होत आहे. सध्या कोविड आहे त्यामुळे गर्दी करता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व माहिती मिळवून देणारा हा उपक्रम नक्कीच उपयोगी ठरेल असे सांगितले.
जयंत पाटील यांच्या योगदानाला साजेसे उपक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो, यंदा कोविडची मर्यादा असल्याने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष संजय बजाज व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिली.