नवी दिल्ली – शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या प्रश्नावरुन केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. घटक पक्ष असलेल्या अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर-बादल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभेत सादर केलेल्या तीन विधेयकांना त्यांनी विरोध केला आहे. गुरुवारी रात्री उशीरा राष्ट्रपची रामनाथ कोविंद यांनी कौर यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यांच्या खात्याचा कारभार कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे देण्यात आला आहे.
कौर यांनी राजीनाम्याची माहिती टविटरवरुन दिली. त्यांनी त्यात म्हटले आहे की, “शेतकरी विरोधी विधेयक आणि कायद्यांचा विरोध करत केंद्रीय मंत्रिमंडळातून मी राजीनामा दिला आहे. शेतकऱ्याची मुलगी आणि बहिण म्हणून शेतकऱ्यांसोबत उभी राहिल्याचा मला अभिमान आहे.”, असे त्यांनी स्पष्ट केले.