काष्टी येथील पहिल्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्रथम शैक्षणिक सत्राचे ऑनलाईन उदघाटन
मालेगाव – कृषी क्षेत्राचे शिक्षण घेतलेले ९० टक्के विद्यार्थी हे विविध क्षेत्रात सेवा करीत असून फक्त १० टक्केच विद्यार्थी हे कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. कृषी क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या पुढे कृषी क्षेत्राचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्याने कृषी क्षेत्रातील उद्योग, व्यवसायाचे परवाने देण्याचा मानस असल्याचे राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे म्हणाले.
राज्य पातळीवरील काष्टी येथील पहिले कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्रथम शैक्षणिक सत्राच्या ऑनलाईन उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महात्मा फुले कृषी विज्ञापीठ राहुरीचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, काष्टीचे कृषी व्यवसाय व्यवस्थापन प्रकल्प अधिकारी डॉ. विश्वनाथ शिंदे, गोकुळ अहिरे, संजय दुसाने, रामा मिस्तरी, विनोद जाधव आदी उपस्थित होते.
तालुक्यातील काष्टी येथे राज्यातील पहिला शासकीय कृषी विज्ञान संकुल हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरू होत आहे. एकाच छताखाली असणारे पाच शासकीय कृषी महाविद्यालय हे संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरणारे असून येत्या दीड ते दोन वर्षात हे महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असा विश्वास व्यक्त करून ना. भुसे म्हणाले राज्यात विद्यार्थ्यासाठी दरवर्षी १५ हजार असतात. त्यापैकी एक हजार जागा रिक्त राहतात. परंतु मालेगाव तालुक्यातील काष्टी येथील विज्ञान संकुलातील पहिल्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील सर्व ४० जागा मेरिट प्रमाणे भरल्या गेल्या आहेत. हे महाविद्यालय नाशिक, नगर, धुळे, जळगाव भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल.
शेतकऱ्यांच्या कष्टामुळे सर्वत्र अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना कोणते पीक घ्यायचे हे माहित आहे. परंतू त्यांना पिकवलेले पीक विक्री करता येत नाही. त्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरू करण्यात आली. बाजारामध्ये ज्या बबींची मागणी असेल त्याच पध्दतीने शेतकऱ्यांनी पीक घ्यावे हा या योजनेचा भाग आहे. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सुरु करण्यात आली. यातंर्गत दरवर्षी ५०० रोपवाटीकांचे वाटप करण्यात येते असल्याची माहिती ही ना. भुसे यांनी दिली. यावेळी डॉ. फरांदे, विद्यार्थीनी किरण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी ना. भुसे यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या तालुक्यातील विद्यार्थी, विद्यार्थीनींचा ना. भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.